माजलगाव तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

माजलगाव तालुक्यातून सावरगाव येथे शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यास बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरूरनंतर बिबट्याने माजलगावकडे मोर्चा वळवला की काय या शंकेने ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली आहे. दरम्यान शेतात सापडलेल्या ठसे व खुणावरून  हा बिबट्या नसल्याचे वन विभागाने गावकऱ्यांना कळवले आहे.

बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याने हैदोस मांडला असून आतापर्यंत तीन जणांचा बळी तर दहाहून अधिक जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अगोदरच दहशत पसरली आहे.

माजलगाव शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले सावरगाव हे माजलगाव धरणाच्या काठावर आहे. या परिसरात उसाची प्रचंड लागवड आहे. आज सोमवारी दुपारी शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे आपल्या शेतात गेले असता त्यांना तेथे बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली. तोपर्यंत बिबट्या गव्हाच्या शेतातून पळाला. त्यावेळी घाबरलेल्या नाईकनवरे यांनी तात्काळ गावकऱ्यांना ही माहिती दिली.

त्यानंतर पंचायत समिती सदस्य मनोज जगताप,सरपंच अभिमान जगताप, यांनी ही माहिती व त्या प्राण्याच्या पायाचे उमटलेल्या ठशाचे फोटो काढून तहसीलदार वैशाली पाटील व वनविभागास पाठवले. या ठशाची शहानिशा करून सदरील पायाचे ठसे हे बिबट्याचे नसून तरसाचे असल्याचे वन विभागाने कळवले आहे. दरम्यान हा प्राणी म्हणजे बिबट्या की तरस याची प्रत्यक्ष खात्री होईस्तोवर गावकर्‍यांचा विश्वास बसणार नसून या प्राण्याची दहशत पसरली आहे.