माजलगाव धरणात बुडालेल्या डॉक्टरांना शोधताना एनडीआरएफ जवान बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजलगाव धरणात रविवारी बुडालेल्या डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा शोध घेण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एनडीआरएफ पथकातील एक जवान पाण्यात शोध घेताना बेपत्ता झाला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे आणखी पेच निर्माण झाला आहे.

माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय फपाळ हे माजलगाव धरणामध्ये ते पोहायला जात असत. रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते लांब गेले. परत येत आसतांना त्यांना दम लागून त्रास होऊन त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृतदेह सापडला नसल्याने बीड, परळी व माजलगाव कारखान्याच्या बचाव पथकांना पाचारण करून त्यांच्या व स्थानिक मच्छिमार तरुणांच्या मदतीने मृतदेहाची शोधमोहीम सुरू होती.
मात्र रविवारी सायंकाळपर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता.

सोमवारी कोल्हापूर येथून आलेल्या एनडीआरएफ पथकातील जवान पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असताना सकाळी दहाच्या सुमारास दोन जवान पाण्यात उतरले. खाली शोध घेत असताना मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात पाय अडकून दोन जवान अडकले. त्यातील शुभम काटकर याला बाहेर काढण्यात यश आले तर राजू मोरे हा जवळपास एक तास झाला तरी बाहेर आलेला नव्हता. त्यामुळे प्रशासन हादरले.

या घटनेची तहसीलदार वर्षा मनाळे यांनी पुष्टी केली आहे. अद्यापपर्यंत जवान बाहेर आलेला नाही, अशी माहिरीत मनाळे यांनी दिली आहे. या ठिकाणी मुख्याधिकारी विशाल भोसले पोलीस उपनिरीक्षक पालवे हे तळ ठोकून आहेत.