कोरोना महामारीचा मोठा फटका नाटय़ चळवळीला बसला आहे. कोरोनानंतर आता नाट्य चळवळ पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. गीतांजली प्रॉडक्शनचे ‘माझ्या देवाक काळजी रे’ हे मालवणी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती सिनेनाटय़ अभिनेते लवराज कांबळी यांनी मालवण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
माझी पत्नी, सिनेनाटय़ अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे नुकतेच निधन झाले. तिच्या निधनामुळे मालवणी भाषेची जाण असलेली अभिनेत्री हरपली. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘माझ्या देवाक काळजी रे’ या नाटकाची निर्मिती करत असल्याचे लवराज कांबळी यांनी सांगितले. या नाटकाचे लेखन विराज कांबळी तर दिग्दर्शन राजू रेवंडकर यांनी केले आहे. नाटकात आपण व संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत असणार आहोत. हे नाटक कौटुंबिक पद्धतीचे असून या नाटकात आठ कलाकार आहेत, असे कांबळी म्हणाले.
मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेचा ब्रँड निर्माण केला. आपण मालवणी नाटकांची निर्मिती करून नाटय़ रंगभूमीवर हरवत चाललेली मालवणी जपण्याचा प्रयत्न करत आहोत. काही महिन्यानंतर नवीन नाटके रंगभूमीवर येतील. नाटय़रसिकांना दर्जेदार मालवणी नाटक देण्यासाठी ‘माझ्या देवाक काळजी रे’ च्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत. मालवणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी या नाटकाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे कांबळी यांनी म्हटले.

































































