
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे एलपीजी गॅस टॅंकर आणि मिनी बस अपघातानंतर टॅंकरमध्ये वायुगळती झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक 17 तास ठप्प होती. रात्री 1 वाजता बावनदी येथील वाहतूक सुरू करण्यात आली.सध्या पाच जखमींवर शासकीय आणि पाच जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
चिपळूणहून रत्नागिरीकडे प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षकांच्या मिनीबसला समोरून येणाऱ्या एलपीजी गॅस टॅंकरने धडक दिली. याअपघातानंतर मिनी बस वीस फूट दरीत गेली. मिनीबसमधील तीस जण जखमी झाले. गॅस टॅंकर पलटी होऊन त्यातून वायुगळती झाली. या वायुगळतीमुळे परिसरात आग लागली. रस्ते रूंदीकरणात गेलेली दोन बंद घरे जळाली. गॅस टॅंकरमधून वायुगळती होत असल्याने सुरक्षेसाठी काल सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला. गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वर मार्गे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पाली व उक्षी मार्गे वळविण्यात आली होती.
टॅंकरमध्ये मोठ्या प्रमाणात वायु असल्याने तज्ञांना बोलावून टॅंकरमधून गॅस काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. रात्री उशीराने टॅंकरमधून सर्व गॅस काढून झाल्यावर 1 वाजता वाहतूक सुरू करण्यात आली.
दोन बॅगा आणि मोबाईल सापडला
गॅस टॅंकरने समोरून दिलेली धडक इतकी जोरदार होती की मिनी बसमधील वस्तू बाहेर फेकल्या गेल्या.आज स्थानिक ग्रामस्थांनी त्यापरिसरात जाऊन पाहणी केल्यानंतर तिथे दोन बॅगा, मोबाईल आणि एक फोल्डर सापडला.
पाच जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
काल झालेल्या अपघातात तीस जण जखमी झाले होते.त्यापैकी आठ जणांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले होते.२२ जणांना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते.त्यापैकी तीन रूग्णांना चिरायू हॉस्पिटलमध्ये,दोघांना परकार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.परकार मधील एका रूग्णाला पुण्यात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.उर्वरित जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
शिक्षक संघटनेची मदत
निवळी येथे शिक्षकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी कळताच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मदतीसाठी धावला. संघटनेचे सचिव संतोष रावणंग हे दिवसभर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांनाही मदत केली. संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.