
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध एक मोठी मोहीम राबवली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून, नक्षलवाद्यांचे तब्बल २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त केले आहेत. ही कारवाई विजापूरच्या घनदाट जंगलात करण्यात आली.
सुरक्षा दलांना विजापूरच्या जंगल भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी शोधमोहीम सुरू केली. जवानांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी दबा धरून अंदाधुंध गोळीबार सुरू केला. जवानांनी तात्काळ मोर्चा सांभाळून प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पाच खूंखार नक्षली जागीच ठार झाले.
सुरक्षा दलांनी केवळ नक्षलींना ठार केले नाही, तर त्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत नक्षलवाद्यांचे २१४ सुरक्षित तळ आणि बंकर पूर्णपणे नष्ट करण्यात आले. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर स्फोटक सामग्री (IED), शस्त्रे आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची मोडतोड करण्यात आल्याने त्यांचे रसद पुरवठा आणि नियोजनाचे नेटवर्क खिळखिळे झाले आहे.
























































