
कांदिवली-बोरिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने घेतलेल्या मोठय़ा ब्लॉकमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अप आणि डाऊनच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या व जलद लोकल जवळपास 25 ते 30 मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे स्थानकांतील पुलांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकलसेवेचे वेळापत्रक विस्कळीत राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे मध्य रेल्वेवर सकाळच्या सुमारास धुक्यामुळे लोकलसेवेची रखडपट्टी झाली.
पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मंगळवारी अप आणि डाऊन मार्गावरील तब्बल 93 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सकाळपासूनच गाडय़ा रद्दचे सत्र सुरू राहिले होते. त्यामुळे नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. पश्चिम रेल्वेने 20 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून 30 दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकचा मोठा परिणाम लोकल सेवेवर झाला असून लांब पल्ल्याच्या गाडय़ादेखील उशिराने धावत आहेत.
z दुसरीकडे मध्य रेल्वेच्या कल्याणपुढील मार्गांवर सकाळच्या सुमारास दाट धुके पडू लागले आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने लोकल सेवेचा वेग मंदावला आहे. विशेषतः खोपोली, कर्जत मार्गावर धुक्याचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत दृश्यमानता कमी जाणवत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून प्रवाशांची लोकल प्रवासात रखडपट्टी होऊ लागली आहे.


























































