शिर्डीत साईभक्त आणि सुरक्षारक्षकांमध्ये तुफान हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन दिवसीय रामनवमी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच शिर्डीत सुरक्षारक्षक व साईभक्तांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. समाजमाध्यमांमध्ये मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भाविकांच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे. दरम्यान, साई संस्थानच्या सुरक्षारक्षकांना भाविकांना मारहाण न करता पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिर्डीत गेल्या तीन दिवसांपासून रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत असून, राज्यच नव्हे देशभरातील लाखो भाविकांनी साईंच्या दर्शनाला गर्दी केली होती. राज्यभरातून अनेक पायी पालख्यादेखील शिर्डीत आल्या होत्या. अशाच एका मुंबईहून शिर्डीत पायी पालखी घेऊन येणाऱया साईभक्त आणि साईबाबा संस्थानच्या सुरक्षारक्षकांमध्ये आज दुपारी मारहाणीची घटना घडली. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताने 5 नंबर एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साईभक्तांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.