
सामना प्रतिनिधी । जामखेड
परिसरातील दुष्काळी परिस्थितीमुळे हुरड्याची लज्जत यावर्षी चाखायला मिळणार नाही. अपुऱ्या पावसामुळे खरीपाबरोबर रब्बी हंगामही वाया गेला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीसाठी वाणाच्या पदार्थाची परिसरात वाणच निर्माण झाली आहे. ज्वारीची कणसे, गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याची डहाळा, बोर, ऊस, वालाच्या शेंगा या वाणाच्या पदार्थाची वाणच निर्माण होणार आहे. या पदार्थांना सोन्याचा भाव निर्माण होणार आहे. तसेच हुरडा पार्ट्या दुर्मिळच होणार आहेत.
जामखेड तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. पाटपाण्याची सोय नाही. परंतु पेरणीसाठी पाऊस झाला तरी ज्वारीचे पीक हमखास येतेच परंतु या वर्षी पेरणीयोग्य पाऊस नव्हता त्यामुळे पेरण्याच झालेल्या नाहीत. काही लोकांनी पेरलेले आहे ते बाटुकच झाले आहे तर काही ठिकाणी करपले आहे. त्यामुळे या वर्षी हुरडा दुर्मिळ होणार आहे.
जामखेड तालुक्यासह बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा व सोलापूर जिल्ह्य़ातील काही तालुके हे रब्बी मालदांडी ज्वारीचे कोठार म्हणून सर्वदूर परिचित आहे. हा परिसर मोठ्या प्रमाणावर मालदांडी ज्वारीसाठी नावाजला जातो. मात्र, सततच्या दुष्काळामुळे व नापिकीमुळे शिवाय यंदाही पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बीचे शिवार सध्या कोमजले आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीसचा भागातील सर्वांना हुरडा पार्टीचे वेध लागतात. थंडीच्या दिवसात शिवारात आगरी (आखटी) पाडून त्यात मोठ्या मोठ्या हिरव्या कच्च्या, कुचकुची, गुळभेंडी जातीच्या ज्वारीच्या कणसाच्या काड्या शेकोटीत भाजून खाण्यात एक वेगळी गंमत असायची. मात्र, यंदाही पावसाअभावी ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर फेल गेल्याने या हुरडा पार्ट्या दूर्मिळ झाल्या आहेत. ज्वारीची कणसे शिवारात मान डोलायला लागली की, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे गावात निरोप यायचे. मात्र, सद्या ही चर्चाच घडत नाही. गणपती उत्सवा दरम्यान व मृग नक्षत्रात पेरण्या आटोपल्या जायच्या. ऐन हिवाळ्यात ज्वारीचा हुरडा तयार व्हायचा. ग्रामीण भागात शहरातील मोठ्या मान्यवरांचे फोन यायचे. हुरडा पार्टीचे नियोजन कसे आहे. मात्र, शेतकयांचा हा रानमेवा यावेळी रूसलेला आहे. एक चवदार, गोड पौष्टिक व बालवर्धक पदार्थ म्हणून हुरडा प्रसिद्ध आहे.
शेतात हुरडा आला की, शेतीमध्ये माणसांचा वावर वाढायचा. सुट्टीच्या दिवशी तर हमखास बेत व्हायचा. मित्र मंडळी, नातलग, पाहुण्यांचा गोतावळा सर्वजण एकत्र जमायचे. शेतात आगटी पडली की टपोरी कणसे काढली जायची आणि लालभडक विस्तवांवर ती भाजायची. भाजलेली कणसे हातावर चोळून त्यातील गोंड बाजूला काढून हुरड्यावर ताव मारला जायचा. हुरडा खात असताना प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे शेंगा व खोबरा चटणी, मिरी व लसूण चटणी, खारे शेंगदाणे, फरसाण, गुळ-मीठ, वांगी, बोर, हरभरा (डहाळा) दही अशी लज्जतदार पदार्थांची रेलचेल होती.
त्याच बरोबरीने शिवारात फिरून कुठे शेंदाडे सापडते का? कुठे वाळूक शेंणी तसेच मोहळ झाडून मध खाणे असा रानमेवा शोधला जायचा. परंतु, दुष्काळामुळे परिसरातील शिवारात सर्वत्र बाटुकच पहायला मिळत आहे. चालू वर्षी परिसरात हुरडा दुर्मिळ बनला आहे. ज्यांच्याकडे हुरड्याची कणसे दिसतात त्यांचेकडे हुरड्यासाठी गळ घालण्यात येत आहे.
या दिवसात शेतीवर दुचाकी सह चारचाकी गाड्याची मोठी रेलचेल असायची आप्तेष्ठ मंडळी व मित्र कंपनी बहुसंख्येने हुरड्यासाठी यायची. हुरडापार्टी बरोबरच मनोरंजाचे खेळ ही व्हायचे. मात्र, यंदा हा सर्व आनंद दुष्काळाने हिरावून घेतला आहे.
काहीं व्यावसायिकांनी व्यावसायिक तत्वावर हुरडा पार्ट्या आयोजित करतात प्रति व्यक्ती हजार रुपये आकारले जातात यात हुरड्याबरोबर नाष्टा, वांगे भरीत ठेचा बाजरीची भाकरी बेसन असे जेवन ऊस, बोर, ढाळा मुलांसाठी खेळ असे मेनू आयोजित केले जातात. परंतु सर्व सामान्य लोकांना हे परवडत नाही. एक तर दुष्काळी परिस्थिती यातच परिसरात फक्त वीस ते पंचवीस टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी बाटूक झाले आहे तर काही ठिकाणी शेताच्या वरच ज्वारी निघताना दिसत नाही. अनेक ठििकाणी तर ज्वाारी करपलेली आहे.
आता वर्षभर खायचे काय गुरांच्या चार्ऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बणणार आहे. सध्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
































































