रंगांशिवाय मी अपूर्ण – आशीष शिंदे

451

दिग्गज कलावंतांच्या चेहऱयावर दुसरा चेहरा चढवण्याचे विलक्षण समाधान मिळते.

माझे वडील रंगभूषाकार. मी लहान असताना त्यांच्याबरोबर चित्रपटाच्या, मालिकेच्या शूटिंगला जायचो. त्यांची ती धावपळ, कलाकारांना अनोख्या पद्धतीने मेकअपद्वारे साकारण्याची कला बघून मलाही या क्षेत्राची आवड निर्माण झाली. हे क्षेत्र माझंच आहे, असं वाटू लागलं. म्हणून मोठा झाल्यावर मी याच कलेची निवड केली.

माझे रंगभूषेतील गुरू उलेश खंदारे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनीच दिलेल्या संधीमुळे मी ‘अलबत्या गलबत्या’,‘आरण्यक’, ‘हॅम्लेट’, आणि ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांसाठी अनेक कलाकारांची   रंगभूषा केली आहे. रंगभूषाकारासाठी त्याला साकारायची असलेली प्रत्येक रंगभूषा ही आव्हानात्मकच असते, असे मला वाटते. कारण कलाकाराबरोबरच तो स्वतःही त्याच्या कलेत घडत असतो. त्याप्रमाणे चिंची चेटकिणीची रंगभूषा खूपच आव्हानात्मक होती. तिच्या डोळ्यांच्या भोवती काळे करणे, लांबलचक नाक, पांढरे केस या साऱयासाठी बराच वेळ लागायचा, मात्र यामुळे रंगभूषा झाल्यावर आत्मिक समाधान लाभायचं. दिलीप प्रभावळकर आणि रवी पटवर्धन यांची रंगभूषा ऐतिहासिक नाटकासाठी असल्यामुळे लांब दाढी, विग, तसाच राजेशाही पेहराव हे सर्व करताना आनंद वाटतो. अशा वेगवेगळ्या विषयांवरील नाटकांसाठी वेगळ्या प्रकारच्या रंगभूषा साकारायला मिळतात. त्यामुळे मी रंगभूषाकार म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो.

चांगला रंगभूषाकार होण्यासाठी काय करायला हवं, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की,  रंगभूषा ही कला आहे आणि या कलेवर रंगभूषाकाराचे प्रेम असायला हवे.

कोणते क्षेत्र निवडावे, याची जाण नसतानाही मला रंगभूषाकार व्हायचे आहे, हे मी ठरवले होते. ठरवल्याप्रमाणे हव्या त्या क्षेत्राची निवड केली. त्यामुळे आनंदाने, मनापासून प्रत्येक रंगभूषा साकारली जाते. त्यामुळे अशाच अनोख्या रंगभूषा साकारण्याची अधिकाधिक संधी मला मिळावी. त्यामध्ये मी पारंगत व्हावे, हीच माझी इच्छा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या