एक दैवी कला

1136

नाटकातील विविध व्यक्तिरेखांचे बोट धरूनच मी रंगभूषा शिकलो.

लेखकाने लिहिलेल्या आणि दिग्दर्शकाने रंगवलेल्या पात्राला बोट धरून पुढे नेणं म्हणजे रंगभूषा. मी शेतकरी कुटुंबातला. आजही सिन्नर तालुक्यात शेती करतो. पोटापाण्याचा व्यवसाय शेती असला तरी हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरचा रंगभूषाकार झालो.

गेल्या 42 वर्षांपासून माझा हा प्रवास सुरू झाला. मुंबईला रंगभवनला हिंदी नाटकांची स्पर्धा होती. तिथे एकदा नाटकाच्या वेळीच मेकअप आर्टिस्ट आले नव्हते. तेव्हा कुणी शिकवतही नव्हतं आणि मेकअप रूममध्ये जाऊही देत नव्हतं. तेव्हापासूनच या कलेविषयीचं आकर्षण मनात निर्माण झालं. ही कला आपण शिकायला हवी असं वाटू लागलं. विशेष म्हणजे नाशिकमध्ये रंगभूषाकारांची कमतरताही होती.

केस पांढरे करण्यासाठी मी शक्यतो फाऊंडेशनचा वापर करतो. व्यावसायिक रंगभूमीवरचं ‘वरचा मजला रिकामा’ या नाटकासाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचा मेकअप केला होता. त्यांचा मेकअप आर्टिस्ट आजारी असल्यामुळे मला अनपेक्षित ही संधी मिळाली. पहिल्यांदा मी नकोच म्हणालो होतो. कारण एवढय़ा मोठय़ा कलाकाराला आपण हात लावायचा याची मला भीती वाटत होती. त्यांची रंगभूषा करताना सर्वप्रथम त्यांनी मला नमस्कार केला. अशी जुन्या लोकांची श्रद्धा, भावना आणि त्यांचं रंगमंचावर असणारं प्रेम.

कलाकार मनापासून श्रद्धा ठेवून आपल्याकडून रंगभूषा करवून घेतात. हा त्यांचा आपल्यावरील विश्वास आहे. हा विश्वास मी आजपर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीचं आमचं मेकअपचं साहित्य असं होतं, स्टार कंपनीची एक 27 नंबर टय़ुब, 30 नंबर टय़ुब, जाई काळजाची डबी, एक लायनिंगची डबी, खाकी वृंदावन पावडर, ब्रश आणि लिपस्टिक एवढंच. झाला मेकअप आर्टिस्ट, पण आज या क्षेत्रातलं तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय की, आम्हाला जास्त डोकं लावावं लागत नाही. स्किन टोनही आम्ही स्वतः तयार करायचो. आता  मेकअपच्या टय़ुब्स मिळतात. यामुळे अभ्यासू वृत्ती कमी होते असे वाटतंय.

त्या काळात मेकअपचे अकरा रुपये मिळायचे. ते नाही मिळाले तर खोबरं वडी, गुलकंद, नारळ, गुलाबाचं फूल मिळायचं. तेही मनापासून घ्यायचो. असं असलं तरी घरच्यांनी साथ दिली. हा रंगभूषेचा प्रवास खूप आनंददायी झाला. त्यामुळे मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. हेच मला या कलेनं मला दिलंय, असं  मी म्हणेन.

आपली प्रतिक्रिया द्या