
रंगभूषाकार राजेश परब. मोठय़ा कलावंतांना एक वेगळा चेहरा देताना सारे कसब पणाला लावले जाते.
रंगभूषाकार होण्यापूर्वी मी एका उपाहारगृहात वेटरचं काम करायचो. तिथेच माझी ओळख रंगभूषाकार मिलिंद कोचरेकर यांच्याशी झाली. त्यांनी सांगितलेले किस्से ऐकून माझ्यातही रंगभूषा शिकण्याचे कुतूहल निर्माण झाले. म्हणून कोचरेकर काकांनी मला बॅकस्टेज करत शिकण्याचा सल्ला दिला. यातूनच माझ्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला मी नाटकाच्या कपडेपटाची जबाबदारी सांभाळू लागलो. त्यानंतर माझी रंगभूषाकार अशोक पांगम यांच्याशी ओळख झाली. चार वर्षे मी त्यांच्याकडून रंगभूषेचं प्रशिक्षण घेतलं.
सुप्रिया विनोद या अभिनेत्रीचा ‘इंदिरा’ या नाटकासाठी मेकअप करण्याची संधी मला मिळाली. रंगभूषा करताना कलाकाराने किती संयम बाळगायला हवा हे यांच्याकडून मला शिकायला मिळालं. त्या संपूर्ण मेकअप होईपर्यंत जागच्या हालायच्याच नाहीत. इंदिरा गांधींच्या मेकअपचं डिझाईन विक्रम गायकवाड यांनी तयार केलं होतं. तो करण्यासाठी पाऊण तास लागायचा. मेकअप करताना फोटोत जशा इंदिरा गांधी दिसतात तसाच रंग सुप्रिया विनोद यांच्या चेहऱयावर लावायचा. तो कसा लावायचा, रंगाची कोणती बाजू वर आणायची. हा सारा रंगांचा खेळ होता, पण यातून मला बरंच नव्या गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या केसांच्या दोन वेण्या घालून पीन अप करून विग लावून मी ‘इंदिरा’ तयार करायचो. यामुळे रंगभूषेत नावाजलेल्या व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांची काम करण्याची पद्धत, फोटो पाहून तशीच रंगभूषा साकारणं, यामध्ये कलाकाराचं नाक बारीक असेल तर रंगाच्या सहाय्यानं मोठं करणं तसेच सुप्रिया ताईंच्या मदतीने आम्ही मेकअपमध्ये थोडे थोडे बदल करून पाहायचो. यामुळे काय फरक पडतो हे लक्षात यायचं. कारण एकच विग असला तरी वयोमानानुसार केस पांढरे करत जाणं आणि चेहऱयावर सुरकुत्या दाखवून वय वाढवलेलं दाखवणं शिवाय इतर कलाकारांनाही त्यांच्यासारखंच वाढलेल्या वयाचं दाखवणं हा माझ्यासाठी एक वेगळा टास्क होता.
रंगभूषा करत असताना बऱयाच मोठय़ा कलाकारांचा मेकअप करण्याची संधी मला मिळाली. यामध्ये विजय चव्हाण, किशोरी आंबिये, संतोष पवार, सुबोध भावे, रमेश भाटकर, संजय नार्वेकर, भालचंद्र (भाऊ) कदम, दिंगबर नाईक, अरुण नलावडे, संकर्षण कराडे, सुप्रिया विनोद, स्मृती इराणी अशी काही नावे घेता येतील. स्मृती इराणीबद्दल मनात खूप भीती होती. ती रागावते वगैरे पण मी काम करत असताना असं कधीच घडले नाही. उलट तीच संभाळून घ्यायची. विजय चव्हाण यांच्याबरोबर काम करणं म्हणजे निव्वळ आनंद. दिंगबर नाईक आणि सुदेश म्हशिलकर यांच्यामुळे रंगभूषा साकारण्याची प्रेरणा मिळाली.
बऱयाचदा आम्हाला असं विचारलं जातं की, नाटकात अभिनयाची संधी मिळाली तर काय कराल? यावर माझं उत्तर हेच की, मी रंगभूषाच करीन. मी या कलेत रमतो. म्हणूनच मला आतापर्यंत रंगभूषाकार म्हणून यश मिळतंय. सध्या काही मराठी, गुजराती आणि हिंदी नाटकातील कलाकारांच्या रंगभूषा करत आहे. सुरुवातील काही बालनाटय़ातही काम केलं. शाळेचं स्नेहसंमेलन असो किंवा बालनाटय़ आपल्याला त्यांच्या वयाप्रमाणेच लहान होऊन काम करावं लागतं. त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळीच मज्जा येते. मोठय़ा कलाकारांसोबत काम करताना व्यावसायिकता, व्यवस्थितपणा जपावा लागतो. सध्या रंगभूषेचे नवे तंत्रज्ञानही नाटकात वापरले जाऊ लागले आहे.
या क्षेत्रात करीयर करण्यास भरपूर वाव आहे, मात्र कोर्स, क्लासची व्यवस्थित चौकशी करा मगच प्रवेश घ्या. तसेच आपल्या कलेसाठी आवश्यक असणारी कल्पकता, सर्जनशीलता, प्रयोगशीलता, रंगांचा अभ्यास हे गुण अंगी बाणा, असे मी या क्षेत्रात येणाऱया नव्या रंगभूषाकारांना सांगेन.

























































