मलबार हिल, पेडर रोड उच्चभ्रू वस्तीत कोरोना पुन्हा वाढतोय

437

दक्षिण मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असताना ‘डी’ वॉर्डमधील मलबार हिल, पेडर रोड अशा उच्चभ्रू वस्तींमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना पुन्हा वाढत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील सर्व पाच ते सहा जण कोरोनाबाधित आढळत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन सरासरी 35 ते 40 होणारी रुग्णांची नोंद गेल्या तीन दिवसांपासून 70 पर्यंत वाढली आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्येही क्लोज कॉण्टॅक्टमुळे झपाटय़ाने रुग्णवाढ होत गेली. मात्र या प्रभागात वाढणारी रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना केल्यामुळे रुग्णसंख्या दररोज आढळणारे 60 ते 65 रुग्णांचे प्रमाण प्रतिदिन 35 ते 40 पर्यंत खाली आले होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सरासरी प्रभागात 70 रुग्ण आढळत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे, पूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असण्याचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. याशिवाय गेल्या तीन दिवसांत प्रभागात 5 पोलीस आणि 4 पालिका कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, ‘डी’ वार्डमध्ये आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4900 झाली असून 198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अशी आहे सद्यस्थिती

  • ‘डी’ वॉर्डमध्ये आतापर्यंत आढळलेल्या 4900 रुग्णांपैकी 3900 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे विभागात सद्यस्थितीत 880 ऍक्टिव्ह केसेस आहेत.
  • ‘डी’ प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवस तर आठवडय़ाची सरासरी वाढ 1.20 टक्के आहे.
  • 500 बेडची क्षमता असणाऱया कोरोना केअर सेंटर (सीसीसी) – 1 मध्ये सध्या 240 जण क्वारंटाइन असून 145 क्षमता असणाऱया सीसीसी-2मध्ये सध्या 47 जणांवर उपचार सुरू आहेत.

    प्रभागात रुग्णसंख्या पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून खबरदारीही घेतली जात आहे. याला रहिवाशांची साथ मिळायला हवी. – प्रशांत गायकवाड, एएमसी

आपली प्रतिक्रिया द्या