मालाडमधील 50 कोरोना रुग्ण पळाले, पोलीस आणि महापालिकेची शोधमोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड विभागात कोरोना संशयितांची तपासणी करताना सुमारे 45 ते 50 रुग्णांनी चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिल्यामुळे पालिका आणि पोलिसांकडून या रुग्णांची शोधाशोध सुरू आहे. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका पोलिसांची मदत घेत असल्याची माहिती पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.

पालिका रुग्णालये, वॉर्डमध्ये जाऊन केली जाणारे सर्वेक्षण किंवा थेट लॅबमध्ये जाऊन कोरोना संशयितांची तपासणी, कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यावेळी रुग्णाचा पत्ता, मोबाईल नंबर नोंदवला जातो. यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची यादी वॉर्डना कळवली जाते. मात्र यामध्ये मालाड विभागात सुमारे 45 ते 50 रुग्णांच्या पत्त्यावर जाऊन किंवा त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने हे रुग्ण शोधण्यात येणार आहेत. हे रुग्ण ‘गायब’ नसल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.