मालाड, अंधेरीतील पाणीप्रश्न मिटणार; पालिका खर्च करणार 7 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड, अंधेरीतील पाणीप्रश्न लवकरच मिटणार असून पालिकेने यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या कामासाठी पालिका 7 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

मुंबईला दररोज सात तलावांमधून 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांमधून 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची आवश्यकता असते. यानुसार पालिका वर्षभराचे नियोजन करीत असते. मात्र मुंबईत दररोज होणाऱया पाणीपुरवठय़ात गळती व चोरी यांमुळे 27 टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे काही विभागात पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होते. त्यामुळे पालिकेने अंधेरी, मालाडमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिन्या बदलणे, नव्या जलवाहिन्या टाकणे अशी कामे केली जाणार आहेत.

असे होणार काम

अंधेरी (पश्चिम), मालाड (पश्चिम) व मालाड (पूर्व) या भागात जलवाहिन्यांची 6 कोटी 67 लाख रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मालाड (उत्तर) या परिसरात गायकवाडनगर, म्हाडा येथील जलवाहिन्यांचे जाळे सुधारित करणे, अंबुजवाडी गेट नंबर 8, मालाड मालवणी व्हिलेज येथील 250 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे.

तर मालाड मालवणी गेट नंबर 6 येथील जलवाहिनी बदलणे, मालाड (दक्षिण) परिसरात आरे कॉलनीत 150 मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. तर अंधेरी (पश्चिम) परिसरात 250 मिमी व्यासाची जलवाहिनी बदलली जाणार आहे.