
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या मालाड-मालवणी येथील 2015 च्या विषारी दारूकांडाचा खटला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या आठवडय़ात सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून मंगळवारपासून आरोपींतर्फे म्हणजेच बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात येणार आहे.
जून 2015 मध्ये मालाड-मालवणी परिसरात विषारी दारू प्यायल्याने 106 नागरिकांना प्राण गमावला होता. या घटनेप्रकरणी सीआयडीने दारु अड्डा चालवणाऱ्या राजू लंगडा याच्यासह 14 आरोपींना अटक केली. हे आरोपी मागील आठ वर्षांपासून तुरुंगात आहेत.
हायकोर्टाच्या आदेशामुळे नियमित सुनावणी सुरू
दारूकांडाच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. सीआयडीने धडक कारवाई केली आणि घटनेनंतर चार महिन्यांतच ऑक्टोबर 2015 मध्ये खटल्याची सुनावणी सुरु झाली होती. मात्र पुढील चार वर्षे खटल्यात ‘तारीख पे तारीख’चे सत्र चालले. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये खटल्याला गती दिली. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमित सुनावणी घेतली जात आहे.




























































