
श्री देवी भराडी माते की जय, जय भराडी, जयजय भराडीच्या जयघोषात शनिवारी संपूर्ण आंगणेवाडी नगरी दुमदुमली. राज्याच्या कानाकोपऱयातून लोटलेला जनसागर भराडीच्या दर्शनाने कृतार्थ झाला. आई भराडीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक मालवण तालुक्यातील आंगणेवाडीत दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय बनल्याचे चित्र होते. मध्यरात्री तीन वाजल्यापासून आई भराडीच्या दर्शनाचा, ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. दिवसभरात मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह पदाधिकाऱयांनी तसेच सिने कलावंतांनी आई भराडीचे दर्शन घेतले. रात्री उशिरा भाविकांचा जनसागर आंगणेवाडीत लोटल्याने परिसर बहरून गेला होता.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
भाविकांना देवीचे दर्शन चांगल्यारीतीने व्हावे यासाठी यावर्षी मालवण व कणकवलीच्या बाजूने नऊ रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळच्या सत्रात खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, संजय पडते, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी तर दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले.
वाहतूक पोलिसांची पथके तैनात
एसटी गाडय़ांबरोबरच लक्झरी, खासगी सहाआसनी, तीनआसनी तसेच अन्य खासगी वाहनांमधून भाविक यात्रास्थळी दाखल होत होते. आंगणेवाडीत खासगी वाहनांसाठी तीन किलोमीटर अंतरावर वाहनतळाची सुविधा करण्यात आली होती. आंगणेवाडीकडे जाणाऱया मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची पथके कार्यरत होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरू होती.
मुंबई-सिंधुदुर्ग ‘समृद्धी’ महामार्ग करणार – मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
कोकणात मत्स्य आणि पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून कोकणचा विकास आम्हाला करावयाचा आहे. त्यादृष्टीने बाळासाहेब ठाकरे मुंबई -नागपूर या समृद्धी महामार्गप्रमाणेच सिंधुदुर्ग-मुंबईला जोडणाऱया ग्रीन फील्ड महामार्गाचे काम राज्य व केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण आंगणेवाडी येथे केली.
































































