मालवणात भगवती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली, हजारो रुपयांवर डल्ला

673

धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील धामापूर येथे तलावाशेजारी असलेल्या श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. टिकाव, कोयता व पहारीच्या साहाय्याने पेटी फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

धामापूर भगवती मंदिर परिसरातील रहिवासी राजेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाच वाजता मंदिरात गेले असता नेहमी बंद असणारा मंदिराचा मुख्य दरवाजा त्यांना उघडा दिसला. पुढे जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तोडून खाली टाकलेले दिसून आले. मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती दूरध्वनीवरून मंदिराचे विश्वस्थ दत्तात्रय देसाई यांना दिली.

दत्तात्रय देसाई, कान्होबा देसाई यांनी भगवती मंदिरात धाव घेतली आणि दूरध्वनीवरून पोलिसांना मंदिरातील चोरीची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेत पाहणी केली.

अज्ञात चोरट्याने भगवती मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि मुख्य गाभार्‍याच्या समोरील बंदिस्त भागाच्या कडेच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असे दिसून येत होते. गाभार्‍यासमोरील दानपेटीचा वरचा भाग टिकाव, कोयत्याच्या साहाय्याने उचकटून काढल्याचे दिसून आले. दानपेटीवरच टिकाव ठेवलेले होते तर कोयता पेटीच्या बाजूला आणि पहार मंदिर परिसरात आढळून आली. पेटीतील सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांची अंदाजे रोख रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले. पेटीचा वरचा भाग पूर्णतः उचकटण्यात चोर असमर्थ ठरल्याने काही रक्कम दानपेटीत राहिली होती.

श्वान पथक पथक चोरट्यांच्या मार्गावर

श्वानास चोरट्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूंचा वास दिला असता श्वानाने मंदिरासमोरील तलावाच्या बंधार्‍यावरून स्मशानभूमी परिसर व त्या मार्गावरून मुख्य रस्त्यावर आला. तेथून कुडाळच्या दिशेने जात धामापूर ग्रामपंचायतीच्या अलीकडील चढावापर्यंत माग दाखवला. दरम्यान ठसेतज्ज्ञांनी चोरी झालेल्या ठिकाणचे ठसे घेतले आणि पुढील तपासासाठी पाठविले आहेत. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या