
बांदिवडे ते भगवंतगड, चिंदर-आचरा जोडणारा रस्ता कालावल नदीपात्रालगत कोसळला आहे. वाहतुकीस हा मार्ग धोकादायक बनला आहे. सदर मार्गाने मोठी वाहने वगळता चार चाकी व दुचाकी तसेच ग्रामस्थ पायी प्रवास करतात. सद्यस्थितीत दुचाकी वाहन चालवनेही धोकादायक बनले आहे.
भगवंतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा मार्ग लालमातीचा आहे. भगवंतगड तसेच मसुरे-डांगमोडे येथील ग्रामस्थ चिंदर-आचरा येथे जाण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करतात. नदीच्या बाजूने जाणारा हा मार्ग आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा बंधारा संरक्षक कठडा नसल्याने पाण्याच्या सततच्या प्रवाहाने रस्ता साईड पट्टी काही दिवसांपूर्वी खचून रस्ता धोकादायक झाला. त्यात रस्त्याचा काही भागही नदीत कोसळला.
या ठिकाणी चिंदर ग्रामपंचायतच्या वतिने सावधानता फलक लावण्यात आला असला तरी रात्रीच्या वेळी अनोळखी वाहन चालकास रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहन थेट नदीत कोसळून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. तरी संबंधीत विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थ व वाहन चालकांमधून होत आहे.






























































