मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा – सिंधू, सात्त्विक-चिराग जोडी उपांत्यपूर्व फेरीत

दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार पुरुष दुहेरी जोडीने शानदार कामगिरी करत मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, पुरुष एकेरीत हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात आले.

दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या माजी जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूने आठव्या मानांकित जपानच्या टोमोका मियाझाकीला अवघ्या 33 मिनिटांत 21-8, 21-13 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना तिसऱ्या मानांकित जपानी खेळाडू अकाने यामागुचीशी होणार आहे. यामागुचीने दुसऱ्या सामन्यात चीनच्या गाओ फांग जीचा 21-11, 4-21, 21-17 असा पराभव केला.

सात्त्विकचिरागची एकतर्फी सरशी

मागील वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप या यजमान मलेशियन जोडीचा 39 मिनिटांपर्यंत चाललेल्या लढतीत 21-18, 21-12 असे हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयासह मलेशियन जोडीविरुद्ध त्यांचा विजयाचा विक्रम 4-0 असा झाला आहे. पुढील फेरीत सात्त्विक-चिराग जोडीचा सामना चायनीज तैपेईच्या चेन झी रे-लिन यू चिएह आणि इंडोनेशियाच्या फजर अल्फियन-फिक्री मुहम्मद यांच्यातील सामन्यातील विजेत्या जोडीशी होईल.

लक्ष्य, आयुष यांचे आव्हान संपले

पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी या हिंदुस्थानी खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनचा हाँगकाँग-चीनच्या ली चेऊक यिऊकडून 53 मिनिटांत 22-20, 15-21 असा पराभव झाला. आयुष शेट्टीला अव्वल मानांकित चीनच्या शी यू क्वीविरुद्ध 70 मिनिटांपर्यंत चाललेल्या चुरशीच्या लढतीत 18-21, 21-18, 12-21 असा पराभव पत्करावा लागला.