महायुती सरकारमध्ये महिला असुरक्षित; नर्सिंग वसतिगृहांमध्ये पुरुष वॉर्डन, पालकांच्या तक्रारीनंतरही आरोग्य विभाग सुस्त

महायुती सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा सातत्याने आरोप होतो. विधिमंडळ अधिवेशनामध्येही विरोधी पक्षाकडून त्या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले जाते. त्यानंतरही महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून गांभीर्याने पावले उचलली जात नसल्याचे उदाहरण समोर आले आहे. राज्यातील नार्ंसग वसतीगृहांमध्ये वॉर्डनचे काम महिलांऐवजी चक्क पुरुषांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे वसतीगृहांमधील हजारो विद्यार्थिनी दडपणाखाली वावरत आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाच्या अखत्यारितील नार्ंसग वसतीगृहांमध्ये कार्यरत असलेल्या 22 पुरुष वॉर्डनची नावे माहितीच्या अधिकारात बाहेर आली आहेत. नार्ंसग कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार महिलांच्या वसतीगृहात फक्त महिला वॉर्डनची नेमणूक करणे बंधनकारक आहे. आदिवासी विभाग, समाज कल्याण विभागाच्या अखत्यारितील मुलींच्या वसतिगृहात वॉर्डनपदी महिला आहेत. आरोग्य विभागात मात्र नियमबाह्य पद्धतीने पुरुष वॉर्डन नेमण्यात आले आहेत.

मंत्री, सचिव, आयुक्तांकडे तक्रार देऊनही कारवाई नाही

नर्सिंग वसतीगृहांमधील शंभरहून अधिक विद्यार्थिनींच्या पालकांनी यासंदर्भात आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव आणि आयुक्तांना पत्रे पाठवली. परंतु त्याची काहीही दखल घेतली गेली नाही किंवा पत्राचे उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवले गेले नाही असा पालकांचा आरोप आहे. सर्व पुरुष वॉर्डन यांना हटवून तत्काळ महिला कर्मचारी नेमा, अशी त्यांची मागणी आहे.

कोणत्या वसतिगृहात कोण वॉर्डन

वर्धा जिल्हा रुग्णालय – अनिल भोयर

 भंडारा जिल्हा रुग्णालय – शेषराव हाले

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय – अरविंद पाईकराव, गजानन काळे, सचिन देशमुख

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय – राहुल जरवाल, प्रेमजीत जाधव, अभिजीत रेडेकर

बुलढाणा जिल्हा रुग्णालय – राजकुमार सिंघल

 ठाणे जिल्हा रुग्णालय – कांबळे

 नागपूर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ – शेखर डेंगरे

आरोग्य विभागाची सारवासारव

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. आरोग्य विभागातील विशेष कार्य अधिकारी देशमाने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नार्ंसग वसतीगृहांमध्ये पुरुष वॉर्डनची नेमणूक करण्यात आली हे सत्य असले तरी आता त्यांना दुसरे काम देऊन त्यांच्या जागी वरिष्ठ परिचारिकांना प्रभार देण्यात आला आहे. पालकांनी मात्र अधिकारी खोटे बोलत असून सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास पुरुष वॉर्डनच काम करत असल्याचे स्पष्ट होईल, असे सांगितले.