
मलिका अमरशेख << [email protected] >>
पापपुण्याच्या व्याख्या कालौघात बदलत चालल्या आहेत. कारण चूक काय बरोबर काय हे ठरवायचं कुणी याचा पेच निर्माण झाला आहे. जगण्याची सत्त्वपरीक्षाच असते ही! ही सत्त्वपरीक्षा घेणारे आपलेच लंकाभेदी. अशावेळी फक्त अनुभव हा असा एकमेव शिक्षक ठरतो जो आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो.
असे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली
अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
पुण्यवान लोक पुण्यात आणि पापी लोक मुंबईत असं नसून पुण्य म्हणजे चांगलं काम करणारे जगात सर्वत्र असतात आणि पापी म्हणजे वाईट काम करणारे पण बरेच असतात. काही वेळा असंही होतं की, चांगल्या लोकांनाच जास्त त्रास भोगावे लागतात. सत्त्वपरीक्षाच! आपल्या पुराणातच पहा ना! रामाला चौदा वर्षे वनवास… पांडवांना अज्ञातवास… द्रौपदीचं वस्त्रहरण…
बरं, ही सत्त्वपरीक्षा घेणारे कुणी देव नसतात. आपलेच लंकाभेदी असतात. रामाला वनवासाला पाठवणारी त्याची सावत्र आई, पांडवांना वनवासात पाठवणारे त्यांचे सख्खे चुलतभाऊ, तर यादव कुळाचा नाश भाऊबंदकीमधूनच. शाप हे फक्त कारण. तसं पाहता आजचं कलियुग पाहता मला मोहिनी भस्मासुराची गोष्टच आठवते. संपूर्ण मानवजात भस्मासुरासारखीच मूर्खासारखी मृत्युनाच करीत आहे. मग अण्वस्त्र युद्ध असो, पर्यावरणाची अपरिमित हानी असो, प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडणं असो वा देशीय-आंतरराष्ट्रीय तणावाची स्थिती असो. मानवता सोडून मानव दानव झालेला आहे. किमान पूर्वीचा माकड झाला असता तरी चाललं असतं. ते किमान नुसत्याच या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मारतात तसं हल्लीचे पण काही मारतात आणि मर्कट आमचे पूर्वज हे दाखवून देतात, पण सगळय़ा विविध पातळय़ांवर मानवानं जगाला न् स्वतःला सर्वनाशाच्या टोकावर आणलंय. आता यात एक गोची अशीही आहे की, काही लोक मतलबासाठी हिंसा करतात तसे काही जण स्वसंरक्षणार्थ पण शस्त्र हाती घेतात. पण मग परिणाम एकच! ‘खरबुजा सुरे पर गिरे या छुरा खरबुजे पर!’
कोई तो कटही जायेगा!
काही वेळा चांगल्या लोकांना पण शस्त्र उचलावं लागते म्हणून तर महाभारत झालं ना!
‘न धरी शस्त्र करी मी -’ गोष्टी सांगेन युक्तीच्या चार.’
असं म्हणणाऱ्या चक्रधरानंही शेवटी सुदर्शनचक्र दोनवेळा उचललंच ना! गूढ संकेत, मुत्सद्देगिरी आणि अचून निर्णय यात कृष्णाइतकी रणनीती संपूर्ण हिंदुस्थानी खंडात व जगातही अजून कुणाला जमलेली नाही.
‘‘तो काय बुवा शेवटी बोलून चालून देवच’’ असं म्हणून पण चालणार नाही. नेहमी डोळे मिटून पर्वतावर निमूट ध्यानस्थ बसलेले हरशंकर पहा. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपलं तप करत राहायचं, अधूनमधून प्रसन्न होत वर द्यायचा, त्यात पण वर घेणारे ऊतमात करीत. मग परत त्याचा सोक्षमोक्ष लावायला विष्णूलाच यावं लागायचं. भस्मासुर, रावण, हिरण्यकश्यपू यांना दिलेले वर नंतर बूमरँगप्रमाणे उलटले.
पहा, भोळेसांब उगाच म्हणत नाही, एवढे देव होते स्वर्गात, पण हलाहल विष शंकरालाच घ्यायला लावलं. आता काही म्हणणारे म्हणतात की, ‘‘अहो, विष घेणार नाही तर काय? घरात किती भांडणं. डोक्यावर गंगा बसलीय म्हणून पार्वती रुसलेली. गळय़ातल्या सापाला कार्तिकेयाचा मोर खाऊ बघतोय. तर गणेशाच्या वाहन उंदराला साप खाऊ की गिळू बघतोय. काय करणार भोळा सदाशिव. घेतलं हलाहल न् काय!’’
आता कोण्या कोटय़धीश विनोदवीराची ही कोटी सोडून द्या, पण मथितार्थ काय? देव असो वा मानव, परीक्षा द्यावीच लागते. फक्त अनुभव हा असा एकमेव शिक्षक आहे की, तो आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो.
काही लोकांना नापास व्हायला आवडतं, तर काही लोकांना या परीक्षा आणि पास-नापासाचं काही पडलेलं नसतंय. त्यांचं दुसरंच पालुपद असतं. सोनं म्हणत असतं, मला घासलं, तापवलं याबद्दल पण काही म्हणायचं नाही, पण गुंजेसारख्या क्षुद्र टिंबभर वस्तूबरोबर मला तोललं जातं याचा फार त्रास होतो. तर असं एकंदर… पाप-पुण्याच्या पण व्याख्या सर्वांच्या वेगळय़ा. ठरवणार कोण? सर्वसामान्य लोक अजूनही तत्त्व, मूल्य, भूतदया, सद्वर्तन, थोरा-मोठय़ांबद्दल आदर, दुर्बलांना मदत यालाच पुण्यवर्तन समजतात, पण आजकाल सर्वच व्याख्या बदललेल्या आहेत. ‘कमिटमेंट’ म्हणजे बांधिलकी हा आता कालबाह्य शब्द झालाय.
‘कालौघात काही प्रजाती नष्ट झाल्या
असं काही म्हणतात
माणसाबद्दल माझं हेच मत आहे!’
अशी माझ्याच कवितेची ओळख उद्धृत करून हे पुण्य-पाप आख्यान समारोपले!





























































