मल्लखांब वर्ल्ड कपला सुरुवात; पहिल्या दिवशी हिंदुस्थानचेच वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राच्या मातीतल्या मल्लखांब या खेळाच्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपला शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सुरुवात झाली. 15 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान हिंदुस्थानच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने, हिंदुस्थानी मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मल्लखांब या खेळाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या दहा व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये सुधाकर देखणे, सुहास पाठारे, सुरेश देशपांडे, आबा घाडगे, ओमानंद गुरुजी, बिभिषण पाटील, रिचर्ड पेअर्सन, हरिभाऊ पिसाळ, अच्युत साठये, उलगा दुराई यांचा समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ

हिंदुस्थान, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, जर्मनी, इराण, इटली, जपान, मलेशिया, नॉर्वे, सिंगापूर, स्पेन, यूके, यूएसए, व्हिएतनाम, बहरीन.

दादर येथील कमला मेहता अंधशाळा यामधील अंध मुलांनी मल्लखांबाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या मुलांनीही मल्लखांबाची अफलातून प्रात्यक्षिके सादर केली. 88 वर्षीय शांतिलाल संघवी यांनी दोरी मल्लखांबावर पद्मासन करून प्रेक्षकांची मने जिंकली.