
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भोपाळमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार, शेतकऱ्यांची दुरवस्था, बेरोजगारी आणि लोकशाहीपुढील आव्हाने अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. “देशाचा स्वाभिमान कमकुवत केला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
सभेला संबोधित करताना खरगे यांनी सरेंडर मोदी, अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. हिंदुस्थान हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे नमूद करत त्यांनी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या करारामुळे देशाच्या मान-प्रतिष्ठेशी तडजोड करण्यात आली असून, सरकार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावत असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या काळात देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याची भीती मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली. “पंतप्रधान मोदी रेडिओवर (मन की बात) खूप बोलतात, पण संसदेत चर्चेला सामोरे जायला घाबरतात,” असा टोला त्यांनी लगावला. सरकारने संसदेत येऊन महत्त्वाच्या विषयांवर उत्तरे द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
हिंदुस्थानातील ६५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना सरकार अमेरिकेच्या धर्तीवर धोरणे आखत असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ते म्हणाले की, “अमेरिकेत केवळ २-३ टक्के लोक शेती करतात. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हिंदुस्तानातील छोट्या शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांना पिकाला योग्य भाव मिळत नाहीये.”
तसेच, बेरोजगारीचा मुद्दा लावून धरल्याबद्दल त्यांनी युवक काँग्रेसचे कौतुक केले. तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, परंतु काँग्रेस याला घाबरणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ देत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने संघर्ष केला, तर आरएसएसशी संबंधित लोक या चळवळीत कुठेच नव्हते. “काँग्रेस आजही गांधींच्या विचारधारेवर चालते आणि तरुणांच्या हक्कांसाठी लढायला राहुल गांधींसारखे नेते मैदानात आहेत,” असे ते म्हणाले.




























































