खोटे बोला पण रेटून बोला, मराठी म्हण वापरत मल्लिकार्जु खरगे यांचा पंतप्रधानांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

INDIA आघाडीची तिसरी बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर सर्व पक्षांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधानांवर टीका करताना त्यांनी चक्क मराठी म्हणीचा वापर केला.

”पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी खोटं बोलतात. लोकं त्याला खरे समजतात. मराठीत एक म्हण आहे, ‘खोटे बोला पण रेटून बोला.’ असं पंतप्रधान मोदींचं आहे,” असं खरगे यांनी म्हटलं आहे

”संसदेचं विशेष अधिवेशन बोलवताना कुणासोबतही चर्चा केली नाही. कुणालाही न सांगता थेट अधिवेशन जाहीर केलं. याआधी कोरोना काळात, चीन हिंदुस्थानवर कब्जा करत होता तेव्हा, मणिपूरातील हिंसाचारानंतर विशेष अधिवेशन बोलावलं नव्हतं, अशी टीका खरगे यांनी केली आहे.

”आपण आता येत्या काळात आपल्यावरच्या हल्ल्यासाठी, धाडींसाठी, अटकांसाठी तयार राहिले पाहिजे. जेवढी आपल्या या आघाडीला ताकद मिळत जाणार तेवढंच भाजप या तपास यंत्रणांचा गैरवापर करत राहणार. महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्रात हे असं राजकारण करून झाले आहेत. झारखंड व छत्तीगढमध्येही गेल्या आठवड्यात असे प्रकार घडले”, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले.

”छोटे घोटाळे ते करत नाहीत. कॅगच्या अहवालात कोट्यावधींचे समोर आले आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं मोदी सांगतात. पण, सर्वांना खाण्यास देऊन लोकांना उपाशी मारत आहेत. ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आम्ही भित्रे नाही आहोत”, असे खरगे यांनी सांगितले.