
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण येथील समुद्रात बुधवारी वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाल्याने मासेमारी व पर्यटनावर परिणाम झाला आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने समुद्री लाटांचा जोर वाढला. किनाऱ्यावर वाऱ्याचा जोर वाढल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केल्याने मच्छीमारांची एकच तारांबळ उडाली. सकाळी मासेमारीसाठी गेलेल्या नौकाही सुरक्षित बंदरात परतल्या तर काहींनी देवगड बंदराचा आसरा घेतला आहे. दरम्यान समुद्रातील वादळ सदृश्य स्थितीमुळे किल्ला होडी वाहतूकीसह जलपर्यटन व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते.
समुद्री वादळाचा परिणाम बुधवारी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून आला. समुद्री उधाणामुळे सकाळपासूनच मालवण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांचा जोर वाढला होता. यामुळे मासेमारी नौका सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मच्छीमारांना कसरत करावी लागत होती. समुद्रात वेगाने वारे वाहत असल्याने मच्छीमारीला गेलेल्या नौका सकाळीच माघारी आल्या. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुपारी 12 ते 12.30 या वेळेत उधाणाचा जोर वाढून मोठमोठ्या लाटा किनारपट्टीवर धडकत होत्या. मात्र दुपारनंतर लाटांचा जोर ओसरला.
मासेमारी व पर्यटनावर परिणाम
समुद्री उधाणामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला. तर सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच समुद्रात चालणाऱ्या स्नॉर्कलिंग, स्कुबा डायविंग यासह अन्य वाटरस्पोर्ट बंद ठेवण्यात आले होते. यामुळे जलपर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. समुद्रात वादळसदृश स्थिती असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.































































