मलपी हायस्पीड ट्रॉलर्सची सिंधुदुर्ग समुद्रात दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

निवती रॉक येथील समुद्रात मासेमारीस गेलेल्या स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या दोन होड्यांना मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सनी घेरल्याची गंभीर घटना दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग समुद्रात घडली. तब्बल एक तास येथील मासेमारी बोटींना घेरल्यांनंतर हायस्पीड बोटींनी पळ काढला.

या घटनेचे चित्रकरण मच्छीमारांनी केले असून याबाबत मत्स्य, पोलीस व महसूल प्रशासनास निवेदन दिले. तर आमदार वैभव नाईक यांचीही मच्छीमारांनी भेट घेतली.

या संपूर्ण प्रकाराची राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. समुद्रात संघर्षाची चिन्हे निर्माण झाल्याने त्यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त जाधव, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याशी संपर्क साधत समुद्रात विशेष गस्ती मोहिम राबवून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्संनी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करताना आपली दहशत सुरू केली आहे. यात निवती रॉक येथील समुद्रात मासेमारी करणार्‍या दोन पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना मलपीतील ट्रॉलर्सनी घेरल्याचा प्रकार घडला. मलपीतील ट्रॉलर्सच्या दहशतीमुळे आता समुद्रात जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली असल्याचा इशारा संतप्त पारंपरिक मच्छीमारांनी दिला. शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर समुद्री गस्तीची प्रभावी अंमलबजावणी केली गेली. यात सातत्य राखले न गेल्याने परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि दहशत पुन्हा वाढू लागली आहे. यात निवती समुद्रात मलपीतील ट्रॉलर्सच्या दहशतीमुळे पारंपरिक मच्छीमार पुन्हा आक्रमक झाले आहेत. मच्छीमारांनी दिलेल्या इशार्‍यामुळे भर समुद्रात केव्हाही मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो.

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पारंपरिक मच्छीमारांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीस मच्छीमार नेते बाबी जोगी, रविकिरण तोरसकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव उपस्थित होते. बैठकीदरम्यान या मच्छीमारांशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संपर्क साधत मत्स्य व्यवसाय आयुक्त  जाधव, पोलीस अधीक्षक गेडाम यांच्याशी केलेल्या चर्चेची माहिती देत विशेष गस्ती मोहीम राबवून कडक कारवाईच्या सूचना दिल्याची माहिती दिली.