मालवण- हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण येथील चौके बाजारपेठमधील हॉटेल व्यावसायिक संजय बाबाजी गावडे (वय 55) यांनी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (18) सकाळी घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे संजय हे चौके बाजारपेठ येथील आपल्या हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये साफसफाई केल्यानंतर ते घरी गेले होते. यानंतर त्यांनी बाथरूममध्ये जात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील कुटुंबातील सदस्यांना संजय यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी आक्रोश करायला सुरुवात केली. त्यांचा आक्रोश ऐकून इतर कुटुंबीय सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपचारासाठी चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर चौके स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चौके येथील बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.