पत्रकारांसाठी ‘मेडिकल जर्नालिझम’ची मुहूर्तमेढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. बातम्यांसाठीची धावपळ, ताण तणाव याचा थेट परिणाम पत्रकारांच्या आरोग्यावर होत असतो. याचा विचार करता पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याच्या काळजी बरोबरच आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करावा, म्हणून पत्रकारांसाठी ‘मेडिकल जर्नालिझम’ आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी केले.

मालवणच्या पत्रकारांना ‘हेल्दी’ पत्रकार म्हणून ओळखले जावेत व ते वैद्यकीय पत्रकारितेच्या दृष्टीने साक्षर व्हावेत यासाठी मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुढाकाराने डॉ. विवेक रेडकर रिसर्च सेंटर ट्रस्टच्या वतीने पत्रकारांसाठी ‘मेडिकल जर्नालिझम’ कार्यशाळा या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. वर्षभर विविध मार्गदर्शन शिबिर, आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तालुक्यातील पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणीने या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. क्षीरसागर, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. रामचंद्र चव्हाण, रविकिरण तोरसकर आदी तसेच वैद्यकीय टीम उपस्थित होती.

यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुका उपाध्यक्ष अमित खोत, संतोष हिवाळेकर, सचिव प्रशांत हिंदळेकर, खजिनदार कृष्णा ढोलम, सहसचिव सिद्धेश आचरेकर यांच्यासह विकास गावकर, गजानन वालावलकर, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, संतोष गावडे, नितीन गावडे, नितीन आचरेकर, परेश राऊत, सौगंधराज बादेकर , महेंद्र पराडकर, महेश कदम, अनिल तोंडवळकर, संदिप बोडवे, संग्राम कासले, आपा मालंडकर, भुषण मेतर, समीर म्हाडगुत, सुधीर पडेलकर, राजेश पारधी, गणेश गावकर, आदी पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते.

डॉ. रेडकर म्हणाले, मालवणच्या पत्रकारांना आरोग्य दृष्ट्या तंदुरुस्त बनविण्यासाठी आमच्या ट्रस्ट मार्फत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आज भारतात मधुमेहाचे प्रमाण आढळत असून ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांमध्येही मधुमेह व इतर आजारांचे प्रमाण दिसून येते. पत्रकारांमध्ये असलेले विविध आजार शोधून काढण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी यापुढेही ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेण्यात येतील. मालवणच्या पत्रकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांसाठीही लवकरच आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात येईल.

सामाजिक दृष्टिकोनातून पत्रकारांच्या आरोग्यासाठी ट्रस्टने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत
प्रफुल्ल देसाई यांनी आभार मानले. तर रविकिरण तोरसकर यांनीही मेडिकल जर्नालिझमचे महत्व पटवून देताना पत्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी ट्रस्टच्या वतीने डॉ. चव्हाण यांनी पत्रकारांचे आभार मानले.