गणेश मूर्तींच्या विसर्जनात गाळाचे विघ्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथील ओहोळात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. याठिकाणी पाचव्या व सातव्या दिवशी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करताना गाळाचे विघ्न असल्याने मूर्ती अर्धवट स्थितीत विसर्जित झाल्या. दरम्यान या घटनेनंतर ओहोळात पाण्याची योग्य साठवण व्हावी व मूर्ती विसर्जन सुलभ व्हावे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. ओहोळातील गाळाचा उपसा करून तात्पुरत्या स्वरूपात श्रमदानाने वाळुच्या पिशव्यांचा बंधारा घातला. यामुळे अकराव्या दिवशी गणेश मुर्ती विसर्जित करणे सुलभ झाले. याबदद्ल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

मालवण देऊळवाडा येथील या ओहोळात गेली कित्येक वर्षे मालवण देऊळवाडा, आडारी, रेवतळे, एस.टी. स्टँड नजीक भरड भागातील गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. यासाठी मालवण नगरपालिकेने गणेश घाटाचीही खास व्यवस्था केली आहे. मात्र यावर्षी पाऊस लांबणीवर पडल्याने या ओहोळात पाणी साठाही कमी झाला. पालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने काही प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला. मात्र वाढलेल्या कांदळवनामुळे अडचणी निर्माण झाल्या.

याठिकाणी विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे पूर्णपणे विसर्जन झाले नाही. ही समस्या लक्षात घेऊन पाणी अडवून त्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक नागरिक यशवंत गावकर व नागेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन इतर नागरिकांच्या सहकार्याने वाळुच्या पिशव्यांच्या साहाय्याने या ओहोळावर श्रमदानाने बंधारा बांधला. बंधारा उभारणी दरम्यान नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या श्रमदानाचे कौतुक केले.