
सामना प्रतिनिधी । मालवण
गंवडीवाडा येथे कामगाराच्या हत्या प्रकरणात मुंबईतून ताब्यात घेण्यात आलेल्या रवींद्र गुलाबराव चव्हाण (34) रा. डोंबिवली मूळ रा. विंचूर- धुळे याला अटक करण्यात आली. त्याला सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता १७ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाच दिवसांपूर्वी मालवण गवंडीवाडा किनार्यावर मासळी उतरविण्याच्या कामास आलेल्या एका कामगाराचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर त्याच्यासोबत असलेले अन्य तीन साथीदार फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांचे खास पथक मुंबईत संशयितांच्या तपासासाठी पाठविण्यात आले होते. यात रवींद्र चव्हाण याला डोंबिवली मुंबईतून ताब्यात घेत येथे आणण्यात आले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत मासळी उतरविण्याच्या कामासाठी डोंबिवली येथून चारजण मालवणात आले होते. ९ तारखेला रात्री ज्या खोलीत ते राहत होते. तेथे रात्री जेवण बनवताना स्टोव्हवरून तिघाजणांमध्ये वाद झाला. यावेळी अन्य दोघांनी तिसऱ्या सोबत्याला बेदम मारहाण केली. त्याला मारहाण होत असल्याचे पाहून मी तिथून पळाल्याचे व नंतर काय झाले ते माहित नसल्याचे रविंद्र याने पोलिसांना सांगितले. दरम्यान या खून प्रकरणातील अन्य दोघे पसार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितले.





























































