उज्वल वारसा लाभलेली मालवणची पत्रकारिता समृद्ध : आमदार वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

मालवण तालुक्याच्या पत्रकारितेला मोठा वारसा लाभला आहे. मालवण तालुक्याचे सुपुत्र व हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबुराव पराडकर यांच्यापासुन लाभलेला हा उज्वल वारसा आजच्या पत्रकारांनी जोपासत मालवणची पत्रकारिता समृद्ध केली आहे. मालवणचे पत्रकार अभ्यासु वृत्तीने व निर्भीडपणे पत्रकारिता करुन अनेक प्रश्नांना न्याय देत आहेत. ही पत्रकारिता आदर्शवत अशी आहे. असे प्रतिपादन, आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा शनिवारी सायंकाळी मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. यावेळी सन २०१६-१७ चा कै. नरेंद्र परब स्मृती आदर्श पुरस्कार सिंधुदुर्ग लाईव्हचे प्रतिनिधी कृष्णा ढोलम यांना, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार सुरेश घाडीगांवकर यांना तर कै. प्रमोद गोसावी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र वराडकर यांना तर २०१७- १८ या वर्षीचा कै. नरेंद्र परब स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार दै. पुढरीचे पत्रकार मंगेश नलावडे यांना तर ग्रामीण विभागातील कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार तरुण भारतचे पत्रकार विशाल वाईरकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झालेले पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांचाही यावेळी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आमदार वैभव नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.