मालवणात मासळी उतरवणाऱ्या कामगाराची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण मध्ये मासळी उतरविण्याच्या कामास आलेल्या एका कामगाराचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह शहरातील गवंडीवाडा किनार्‍यावर आढळला. मृतदेहाच्या शरीरावर व डोक्यावर जखमा आहेत. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत इसमा सोबत असणारे तीन साथीदार पसार असल्याची माहिती समोर आल्याने ही हत्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिलीप असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शहरातील बाजारपेठेतील एका चायनीज सेंटरवर कामास असलेल्या एका कामगाराने डोंबिवली नाका येथून चार कामगारांना मासळी उतरविण्याच्या कामासाठी ३ तारखेला मालवण येथे आणले होते. मत्स्य व्यावसायिक लीलाधर पराडकर यांच्याकडे ते मासळी चढविणे व उतरविण्याचे काम गेले तीन दिवस करत होते. मात्र यातील दोन कामगारांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने तसेच ते काम करण्यास योग्य नसल्याचे दिसून आल्याने मंगळवारी रात्री पराडकर यांनी त्या दोघांना पैसे देत जेवण करून तुम्ही तुमच्या गावी जा असे सांगितले. अशी माहिती समोर आली आहे.

एका कामगाराचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सकाळी गवंडीवाडा येथील किनार्‍यावर स्थानिक मच्छीमारांना आढळून आला. त्या मासळी उतरवणाऱ्या कामगारां पैकी एकाचा मृतदेह असल्याचे समजले. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, संतोष गलोले, सुनील पवार, आशिष भाबल हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकाराची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर, लीलाधर पराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली.

शरीरावर अनेक जखमा

मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव दिलीप असल्याची माहिती मिळाली. मात्र गवंडीवाडा येथे ज्याठिकाणी चार कामगार वास्तव्यास होते. त्याठिकाणी पाहणी केली असता त्याचे अन्य तीन साथीदार पसार असल्याचे दिसून आले. मृत कामगाराच्या पोटावर, पाठीवर, पायावर जखमा तसेच डोक्यास जखम असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कणकवली येथील आय-बाईक या पथकास घटनास्थळी पाचारण केले. दुपारी घटनास्थळी दाखल झालेल्या या पथकाकडून रक्ताचे डाग तसेच ते वास्तव्यास असलेल्या खोलीची तपासणी करण्यात आली. उशिरापर्यंत याबाबतचा तपास सुरू होता.

पोलिसांकडून त्या सर्वांचा शोध सुरू

चायनीज सेंटरवरील ज्या कामगाराने त्या चार कामगारांना डोबिंवली नाका येथून येथे आणले त्या कामगारास या चारही जणांची चांगली विशेष माहिती नव्हती. यामुळे मृत कामगाराचे तसेच त्याच्या साथीदारांची पूर्ण नावे व माहिती मिळत नव्हती. केवळ तो मृतदेह दिलीप नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्या कामगारांचा शोध पोलीस घेत आहेत.