
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR शी संबंधित प्रकरणांमध्ये जीव गमावलेल्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी त्या सर्वोच्च न्यायालयात जातील आणि कायदेशीर लढाई लढतील. आपले सरकार पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करेल आणि त्या स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूक आयोगाकडून लोकांना ‘गायब’ करण्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र असे करणारेच नष्ट होतील, असा हल्लाबोलही बॅनर्जी यांनी केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आणि म्हटले की, व्हॉट्सअॅपद्वारे लोकांना “गायब” करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु जे असे करत आहेत ते स्वतः राजकीयदृष्ट्या नष्ट होतील. राज्यात कोणत्याही वक्फ मालमत्तेवर कब्जा करू दिला जाणार नाही, तसेच कोणतेही डिटेंशन कॅम्प बांधू दिले जाणार नाहीत. ममतांनी न्यायासाठीचा लढा निर्णायक निष्कर्षापर्यंत नेण्याची शपथ घेतली. मी येथे कोणत्याही वक्फ मालमत्तेवर कब्जा करू देणार नाही. तसेच येथे कोणतेही डिटेंशन कॅम्प बांधले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.




























































