
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी राणीगंज येथील निवडणूक सभेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. “भाजपच्या अंताची सुरुवात याच बंगालच्या भूमीतून होईल आणि त्यांना दिल्लीतही मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मुर्शिदाबादमधील रघुनाथगंज येथे राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “भाजपने दंगली घडवण्यासाठी आपले अधिकारी पाठवले आहेत. रघुनाथगंजमध्ये दुकानांची तोडफोड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या असून याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.” त्यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपच्या सांगण्यावरून मतदार यादीतून नावे वगळली जात असल्याचा आरोप केला.
ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही भाजपला लक्ष्य केले. “भाजप अवैध कोळसा खाणींतून पैसे घेते आणि तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करते,” असे त्या म्हणाल्या. तसेच जर भाजप सत्तेत आली, तर ते लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवतील आणि सर्वांना बाहेर काढतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सभेत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, “माझे लोक राम नवमी, दुर्गा पूजा, ख्रिसमस आणि ईद असे सर्व सण मिळून-मिसळून साजरे करतात. आम्ही सर्व धर्म आणि जातींच्या लोकांचा सन्मान करतो, पण भाजप केवळ विभाजनाचे राजकारण करत आहे.”



























































