पाकिस्तान कोलकात्यावर हल्ल्याची धमकी देतोय आणि मोदी अवाक्षर काढत नाहीत! ममता बॅनर्जी यांची विखारी टीका… तुम्हाला लाज वाटत नाही का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘‘पाकिस्तानचे नेते हिंदुस्थानात घुसून कोलकात्यावर हल्ल्याची धमकी देतात आणि मोदी त्यावर अवाक्षर काढत नाहीत. त्यांना लाज वाटत नाही का? मोदींनी राजीनामा दिला पाहिजे,’’ अशी विखारी टीका ममतांनी केली.

नादिया जिह्यातील बेथुआडहरी येथे प्रचारसभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्याला उत्तर देताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी शनिवारी हिंदुस्थानला धमकी दिली. कोलकात्यापर्यंत घुसून मारू, असे ते म्हणाले. त्याचा संदर्भ देत ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘‘कोणी कोलकात्यावर हल्ला करण्याची भाषा करत असेल तर हिंदुस्थानी नागरिक म्हणून आम्ही ते सहन करू शकत नाही. मात्र आपले पंतप्रधान शांत आहेत. त्यांनी कालच कुचबिहारमध्ये सभा घेतली. पण ते एक शब्दही बोलले नाहीत,’’ असा संताप ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

दुसरे पहलगाम घडवायचे आहे का?

ममता बॅनर्जी यांनी या वेळी भाजपवर खळबळजनक आरोप केला. ‘‘नरेंद्र मोदी हे पाकिस्तानच्या धमकीला उत्तर का देत नाहीत? आम्ही कडक कारवाई करू असे का म्हणत नाहीत? त्यांच्या मौनामागचे कारण काय आहे? निवडणुकीआधी दुसरे पहलगाम घडवण्याची ब्लू प्रिंट तयार आहे का?’’ असा संशय ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.