ठाण्यातील प्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या घासालाच ठसका आणि डोळय़ांत पाणी हा ठाण्यातील प्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’चा अंगभूत गुण. किंबहुना ही मिसळ प्रसिद्ध झाली ती झणझणीतपणासाठीच. या मिसळीने अनेकांच्या जिव्हा तृप्त केल्या आणि डोळय़ांत पाणीही आणले. आज मात्र मामलेदार मिसळीचा पहिला घास घेण्यापूर्वीच सर्वांच्या डोळय़ात टचकन पाणी आले… कारण या मिसळीचा मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचा कोरोनाने बळी घेतला. ते 84 वर्षांचे होते.

लक्ष्मण मुर्डेश्वर हे मामा या नावाने सर्वांना परिचित होते. गेल्या 15 दिवसांपासून ते आजारी होते. कोरोनाची लागण झाल्याने मुर्डेश्वर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले. अनलॉकनंतर सर्व दुकाने व हॉटेल्स खुली झाली. आवडती मामलेदार मिसळदेखील नव्या जोमाने ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली होती. लक्ष्मण मुर्डेश्वर हे स्वतः नेहमीप्रमाणे गल्ल्यावर बसायचे. सोशल डिस्टंसिंग पाळून त्यांनी खवय्यांसाठी बसण्याची खास व्यवस्था केली होती.

सर्व कारभार पुन्हा नव्या दमाने सुरू झाला असतानाच मुर्डेश्वर यांना कोरोनाने गाठले आणि त्यातच त्यांचे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. मुर्डेश्वर कुटुंब मूळचे कर्नाटकचे. पण ते ठाण्यात आले आणि येथील संस्पृतीशी एकरुप झाले. त्यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी 1946 मध्ये ठाण्याच्या मामलेदार कचेरीबाहेर छोटेसे कॅण्टीन सुरू केले आणि थोडय़ाच वर्षात त्यातील चविष्ट मिसळने लाखो खवय्यांची मने जिंकली. त्यांच्या निधनाबद्दल ठाण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.