
समाजातील सर्व घटकांना मदतीचा हात देणाऱया ‘जाणीव’ संस्थेच्या माध्यमातून यंदाही कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे. आज शनिवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे हा सत्कार सोहळा होणार असून महिलांना माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने दिला जाणाऱया ममता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत अध्यक्ष असलेल्या ‘जाणीव’ संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱया कर्तृत्ववान महिलांना माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने ‘ममता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याही वर्षी जाणीवच्या वतीने शनिवार, 7 मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात एकल महिलांच्या उद्धाराकरिता झटणाऱया वैदेही सावंत, निराधारांची सेवा करणाऱया अनिता नारकर, राजकीय जीवनात तरुणपणातच अभ्यासूवृत्तीने आपली बाजू मांडणाऱया प्रियांका जोशी, साहित्याची अवीट गोडी जपणाऱया सुरेखा गावंडे, साहित्यातील अनेक रसांचा विश्लेषणपूर्वक अभ्यास करून त्यावर निबंध, कथा लिहिणाऱया व कथाकथन करणाऱया लक्ष्मी जाधव आणि सैनिक स्कूलच्या राष्ट्रीय प्रवेश स्पर्धेत देशात पहिली आलेल्या अनुराधा बुधवंत यांचा कल्पना सरोज यांच्या हस्ते ‘ममता’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळय़ास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

























































