राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी टोचांग अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी तीन महिन्यांत राजीनामा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रविवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला यापूर्वी 2018 मध्ये माजी मुख्यमंत्री लाल थनहवला यांना धमकीचे पत्र लिहिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. वेगवेगळ्या फेसबुक ग्रुप्सवर शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, रॉडिन्लियाना उर्फ अपुया टोचांग (37) या व्यक्तीने झोरामथांगा यांच्यावर वैयक्तिक फायद्यासाठी राज्याचे वार्षिक बजेट हडप केल्याचा आरोप केला आहे. तो आइजॉलच्या चनमारी पश्चिम भागातील रहिवासी आहे.

मिझोरामचे पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) जॉन नेहलिया यांनी पीटीआयला सांगितले की, सायबर क्राईम पोलिसांनी बनावट खात्याचा तपास केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.