
शिक्षक भरती करण्याच्या मागणीवरून एका अज्ञात व्यक्तिने मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण जाळी असल्याने सुदैवाने या व्यक्तिला फारशी दुखापत झाली नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात असे प्रकार घडू लागल्याने मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी दुपारी मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तिने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र संरक्षण जाळीमुळे त्यांना दुखापत झाली नाही. पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तिला थांबवून जाळीतून बाहेर काढलं. शिक्षक भरती तत्काळ करावी, कंत्राट स्वरुपातील भरती बंद करावी या मागणीसाठी सदर व्यक्तिने आंदोलन केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. हा तरुण नेमका कोण आहे, याची माहिती मिळालेली नाही.
Mumbai Police say, “A man jumped off the second floor of Mantralaya. He fell on the safety net put up there so there was nothing untoward and he was safe. The man has been taken into custody and further investigation is underway.”
— ANI (@ANI) September 26, 2023
दरम्यान, राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याचा दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. समूह शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक भारती संघटना आक्रमक होणार असल्याचे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले.





























































