
एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या भांडणातून टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यानंतर परिसरातील दोन वाहनांची तोडफोड केल्याची घटना काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गंजपेठेत घडली आहे. याप्रकरणी तुषार गणेश नेटके (वय 20), शशिकांत चंद्रकांत भोंडे (वय 21, दोघेही रा. गंजपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रेम अमर आटोळे (वय 20) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम हे त्याच्या आईसोबक घराबाहेर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी गणेश, शशिकांत इतर साथीदारांसह शिव्या देत येत होते. त्यावेळी प्रेमने त्यांना कोणाला शिवीगाळ करतो, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे शशिकांतने प्रेमला तु आमच्याकडे नेहमी खुन्नसने का पाहतो, तुला लय मस्ती आली का, असे म्हणत आरोपींनी प्रेमला शिवीगाळ केली. त्यानंतर मुख्य अल्पवयीन आरोपीने प्रेमच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर परिसरातील दोन वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टोळक्याच्या धुमाकुळामुळे परिसरातील लोक सैरावैरा धावत होते. याप्रकरणी मुख्य अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी दिली आहे.
































































