
सामना ऑनलाईन । पुरंदर
मराठा आरक्षणासाठी तरुणांचे आत्महत्यांचे सत्र सुरुच असून पुरंदर तालुक्यातील एकाने रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. दत्तात्रय तुकाराम शिंदे (३३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याच्या खिशात मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये त्याने मराठा आरक्षणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुण दत्तात्रय तुकाराम शिंदे यांनी जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-पंढरपूर महामार्गालगत दौडज खिंडीत रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. मराठा आरक्षण मिळावे यासाठी सक्रिय आंदोलनात सहभागी असणारे शिंदे यांनी आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करणार आहोत अशी सुसाईड नोट लिहून ठेवल्याची पोलिसांकडून माहिती मिळते. सुसाईड नोट संदर्भात अधिकची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. मयत शिंदे यांच्या पश्चात आई, अविवाहित भाऊ, चार वर्षांचा एक मुलगा आणि गरोदर पत्नी असा परिवार आहे.
मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच आत्महत्या आहे. पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव मानले जाते. कारगील युद्धातील पहिले शहीद शंकर शिंदे यांचे हे गाव. या गावातील तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या परिसरात तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



























































