म्हैस दूध काढू देत नाही! मालकाची पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसाधारणपणे चोरी, दरोडा किंवा याहून गंभीर गुन्ह्यांसाठी पोलिसात धाव घेतली जाते. पण, मध्य प्रदेशच्या एका माणसाने म्हैस दूध काढू देत नाही, म्हणून पोलिसात तक्रार केली आहे.

मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील नया गाव येथे हा शेतकरी राहतो. बाबूराम असं या शेतकऱ्याचं नाव आहे. शनिवारी बाबूराम आपल्या म्हशीला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला.

त्याने तक्रार केली की त्याची म्हैस दूध काढू देत नाही. मला दूध काढायला मदत करा. त्याने पोलिसांकडे एक लेखी अर्जही सादर केला. पोलिसांनी त्याला समजावून परत पाठवलं. मात्र, काही वेळाने तो पुन्हा पोलिसांच्या दारात येऊन उभा राहिला. मग पोलिसांना लक्षात आलं की हे प्रकरण दिसतं तेवढं साधं नाही.

पोलिसांनी त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका पशुवैद्याला बोलावलं. त्या पशुवैद्याने बाबूरामला म्हशीचं दूध कसं काढावं याची माहिती दिली. सोबत म्हशीला कोणता आजार नाही ना याचीही खातरजमा केली.

भविष्यातही जर म्हशीला काही त्रास होत असेल तर म्हशीची तपासणी करण्याचा सल्लाही त्याला देण्यात आला.