
शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथील स्टिलच्या दुकानात झालेल्या 17 लाखांच्या चोरीचा उलगडा झाला आहे. भावाला पैसे द्यावे लागू नयेत, यासाठी फिर्यादीनेच चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जयंतीलाल रामलाल ओसवाल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जयंतीलाल रामलाल ओसवाल याचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी ‘अंबिका स्टील’ या नावाचे दुकान आहे. तेथून तो सळई, सिमेंट, फरशी यांसह अनेक प्रकारच्या साहित्याचा विक्री व्यवसाय अनेक वर्षांपासून करीत आहे. तेथे त्याच्या कुटुंबीयांसह लहान भाऊ प्रकाश राहत होता. भाऊ प्रकाश याला दुसऱया ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे द्यायचे ठरले होते. दरम्यान, मंगळवार दि. 6 रोजी सर्व कुटुंबीयासह कराडला जेवण करून आल्यावर आपल्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी जयंतीलाल ओसवाल याने कोकरुड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. दरम्यान, जयंतीलाल याच्या संशयास्पद वागण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी भावाला पैसे द्यायचे नसल्याने मीच 17 लाख 70 हजार रुपये कराड येथील मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करून संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहायक पोलीस फौजदार शंकर कदम, पोलीस एकनाथ भाट, मोसीन मुल्ला, विशाल भोसले, शेखर गायकवाड, सायबर पोलीस ठाण्याचे गुंडवाडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.






























































