बैलाने केला मालकाचा घात; बैलाच्या हल्ल्यात पिसईतील वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिसई वझरवाडी येथे राहणाऱ्या एका 65 वर्षांच्या शेतकऱ्यावर त्यांच्याच बैलाने हल्ला केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दापोली तालुक्यातील पिसई येथील वझरवाडीत कायम राहणाऱ्या विठोबा सखाराम घोले या शेतकयाचा मृतदेह शुक्रवारी पिसई महसुली गावाच्या कासार काडीचा पऱ्या येथे आढळून आला. विठोबा सखाराम घोले यांनी नेहमीचा शर्ट घातला नव्हता म्हणून बैलाने त्यांना ओळखले नसावे त्याच रागातून बैलाने हा हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

विठोबा घोले नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला वाड्याात आणण्यासाठी गेले असता त्यांच्या बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. दापोली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. गुरुवारी विठोबा घोले दापोलीत आले होते. दापोलीतून पिसईला गेल्यावर त्यांचा बैल कासार काडीचा पऱ्याकडे असल्याचा त्यांना फोन आल्याने ते घरी न जाता परस्पर बैलाला वाड्याात आणून बांधण्यासाठी गेले. मात्र ते परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. सकाळी त्यांचा मृतदेह आढळला, त्यांच्या डोक्याला मानेला व छातीवर जखमा असल्याने बैलाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पिसई वझरवाडीत घोले यांच्या बैलाची मोठी दहशत असून बैल दिसल्यास ग्रामस्थ भीतीपोटी पळून जात होते. गावात कोणीही त्या बैलाच्या जवळ जात नव्हते. तसेच घरातील व्यक्तींनाही यापूर्वी त्या बैलाने मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या बैलाला विकून टाकण्याचा सल्ला अनेकजण देत होते. मात्र बैल चांगला आहे म्हणून त्यांनी या बैलाला घरीच ठेवले होते. घोले यांनाच हा बैल घाबरत होता इतर कोणालाही तो जवळ येऊ देत नव्हता. परंतु अचानक बैलाने मालकावर हल्ला केल्याने बैलाच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.