पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून काढला पळ, पळून गेलेल्या आरोपीला केले गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून पळून गेलेल्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. त्याच्यावर सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कांदिवली पश्चिम येथे जय जीवदानी नावाचे दुकान आहे. 11 दिवसांपूर्वी त्याच्या दुकानातील शटर तोडून चोरटय़ाने रोख रक्कम, काजू आणि बदाम चोरून पळ काढला होता. घडल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने खार, वांद्रे, दहिसर, सांताक्रुझ, जोगेश्वरी, जुहू, बोरिवली परिसरात घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी केली. त्याला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी कांदिवलीच्या साईनगर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले.

क्वारंटाइन सेंटरमध्ये असताना आरोपीने दुसऱया मजल्यावरून उडी मारून पळ काढला. हा प्रकार तेथील कर्मचाऱयाच्या निदर्शनास आला. त्याने याची माहिती कांदिवली पोलिसांना दिली. कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. आरोपी हा त्याच्या पत्नीच्या संपर्कात असून तिला भेटायला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कांदिवली पोलिसांचे पथक जोगेश्वरी येथे गेले. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीची मदत घेतली.

पीपीई कीट घालून पोलिसांची फिल्डिंग

पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला सजमावून सांगितले की, तुमचा पती कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याला भेटलात तुम्हालाही कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगत त्यांची समजूत काढली आणि पोलिसांच्या पथकाने जोगेश्वरी परिसरात सापळा रचला. आरोपी हा पत्नीला भेटण्यासाठी आला असता पीपीई किट घालून फिल्डिंग लावून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. आरोपीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्याची चौकशी केली जाणार असल्याचे कांदिवली पोलिसांचे म्हणणे आहे.