
‘राँग नंबर’वरून आलेला मुलीचा फोन कॉल उचलल्यानंतर त्याच मुलीच्या प्रेमात पडलेला तरुण पोक्सोच्या गुन्ह्यात अडकला. प्रेमसंबंधात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली. त्यानंतर साडेचार वर्षे तुरुंगात कैद राहिलेल्या तरुणाला अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी आरोपी तरुणाला 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडून देण्याचा आदेश दिला.
पुणे जिह्यातील जुन्नर येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने मावशीच्या मुलाला संपर्क करण्यासाठी पह्न कॉल केला होता, मात्र तो कॉल चुकून कोल्हापूर-हातकणंगले येथील आरोपी तरुणाला लागला होता. आपला कॉल ‘राँग नंबर’वर लागल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने तो कॉल कट केला होता. त्यानंतर आरोपी तरुणाने मुलीला रिटर्न कॉल केला. पुढच्या काळात दोघे एकमेकांना कॉल्स करू लागले आणि त्यांच्यात प्रेमाचे सूत जुळले. हा सर्व प्रकार मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर मुलीवर तिचे वडील रागावले. त्यानंतर मुलगी आरोपीसोबत पळून गेली. यादरम्यान आरोपीने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलीच्या पित्याने केला. त्या तक्रारीच्या आधारे ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून तरुणाला 27 नोव्हेंबर 2018 रोजी अटक करण्यात आली.
खटला न चालवता आणखी किती वर्षे तुरुंगात ठेवणार?
आरोपी तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत किमान 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, असा युक्तिवाद करीत सरकारी पक्षाने तरुणाच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. न्यायालयाने मात्र सरकारी पक्षाचा विरोध धुडकावून लावला. खटल्यात कुठलीही प्रगती नाही. खटला न चालवता आरोपीला आणखी किती वर्षे तुरुंगात ठेवणार? किंबहुना, लैंगिक शोषणाचा आरोप सिद्ध करण्यासाठी प्रथमदर्शनी सबळ वैद्यकीय पुरावेही दिसून येत नाहीत, असे निरीक्षण न्यायमूर्ती नाईक यांनी जामीन मंजूर करताना नोंदवले.
























































