स्वस्तातले टुरिस्ट पॅकेज पडले महागात, 11 जणांना लाखोचा गंडा

18

सामना प्रतिनिधी । मुंबई

तुर्कीला जाण्यासाठी स्वस्तात मस्त टुरिस्ट पॅकेज मिळवून देतो अशी बतावणी करीत तिघा भावांनी 11 जणांना लाखोचा गंडा घातल्याची घटना मुलुंड येथे घडली. याप्रकरणी दोघा भावांना नवघर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असून त्यांचा मोठा भाऊ व या गुन्ह्याचा मास्टरमाइंड मात्र फरार झाला आहे.

मुलुंडचे व्यावसायिक नीलेश सावंत (42) यांना तुर्कीला जायचे होते. यासाठी त्यांनी ऑरिस ट्रव्हल्सच्या रोशन भाटेजांशी संपर्क साधला. तेव्हा तुम्ही मोठय़ा ग्रुपने जाणार असाल तर स्वस्तात टुरिस्ट पॅकेज मिळवून देतो असे रोशनने त्यांना सांगितले. सावंत यांनी टुरसाठी ओळखीच्या अकरा जणांचा ग्रुप तयार केला. त्यानंतर रोशनने त्याचे दोन भावांची ओळख कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार रोशनचे भाऊ रवींद्रकुमार (38) आणि सुनीलकुमार (41) यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटून सावंत यांच्या सहकाऱयांकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेतले. रोशनने सर्वांना विमानाचे तिकीटदेखील दिले. ठरल्यादिवशी सर्वजण तुर्कीला जाण्यासाठी विमानतळावर गेले. पण नीलेश सावंत वगळता बाकी सर्वांची तिकिटे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. रोशनने आपली फसवणूक केल्याचे समजताच नीलेश सावंत यांनी त्याच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, एपीआय दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक दत्ताजीराव पवार तसेच महागावकर व पथकाने तपास सुरू करून रवींद्रकुमार आणि सुनीलकुमार यांना अटक केली असून रोशन फरार आहे.

म्हणून विश्वास बसला
नीलेश सावंत यांनी यापूर्वी कश्मीर टूर केली होती. त्यावेळी रोशन भाटेजा यानेच त्यांना स्वस्तात टुरिस्ट पॅकेज मिळवून दिले होते. त्यामुळे तुर्कीचे टुरिस्ट पॅकेजदेखील रोशन स्वस्तात मिळवून देईल असा अंदाज होता. पण त्याने फसवणूक केल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. राकेशविरोधात अशा प्रकारे खार,नवी मुंबई येथेदेखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या