एक हजार मुलांचा बाप बनला हा माणूस, बायकोला पत्ताच नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांमध्ये एका महिलेचं वृत्त चांगलंच चर्चेत आलं होतं. ही महिला टेस्ट ट्युब पद्धतीने जन्माला आली होती आणि तिचा जैविक पिता वेगळा होता. तिने त्याच पित्याकडून जन्माला आलेल्या 63 अन्य लोकांचा शोध घेतला होता. स्पर्म डोनर किंवा वीर्यदान ही संकल्पना तशी नवीन वाटत असली तरी जवळपास 80 वर्षांपूर्वी अशाच एका घटनेने खळबळ माजवली होती.

साधारण 1940च्या दशकात एका माणसाने वीर्यदान करून 1 हजार मुलांना जन्म दिला होता. या माणसाचं नाव होतं बर्टोल्ड वाइजनर. वाइजनरची पत्नी देखील वैद्यकीय तज्ज्ञ होती. तिचं नाव मेरी बार्टन होतं. या दोघांनी एक फर्टीलिटी क्लिनिक सुरू केलं होतं. अतिशय वादग्रस्त राहिलेल्या या क्लिनिकमध्ये अनेक लोक वीर्यदान करत असत.

पण, या क्लिनिकने त्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. फक्त बुद्धिमान पुरुषच इथे वीर्य दान करू शकत होते. त्यामुळे फक्त उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत पुरुषच इथे वीर्यदान करत असत. हे क्लिनिक बंद व्हावं यासाठी वाद सुरू झाले होते आणि त्याचवेळी त्याची लोकप्रियता वाढत होती.

एक वेळ तर अशी आली की, या जोडप्याच्या जवळच्या वर्तुळातील व्यक्तीच इथे वीर्यदान करू शकत होत्या. इतके वाद होऊनही वीर्यदात्यांची मागणी वाढताना दिसत होती. अखेर या क्लिनिकचे मालक असलेले वाइजनर यांनी स्वतःच वीर्यदान करण्याचा निर्णय घेतला.

गंभीर म्हणजे मेरी बार्टन यांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता. त्याचा खुलासा काही काळाने त्यांनी स्वतःच एका मुलाखतीतून दिला होता. वाइजनर यांच्या या कृत्याचा शोध त्यांनीच जन्म दिलेल्या दोन माणसांमुळे लागला. 2007मध्ये बॅरी स्टीव्हन्स नावाचा माहितीपट निर्माता आणि डेविड गोलांज नावाचा एक वकील यांना आपल्या जैविक पित्याचा शोध लागला होता. ते वाइजनर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या जैविक बंधुंचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वाइजनर यांनी जवळपास 1 हजार मुलांना जन्म दिला आहे.

बार्टन यांनी 1972ला मृत्युपूर्वी या क्लिनिकचे सगळे जुने दस्तऐवज नष्ट केले होते. त्यामुळे वाइजनर यांनी आणखीही काही मुलांना जन्म दिला का किंवा या क्लिनिकमध्ये नेमका किती मुलांना जन्म देण्यात आला, याची ठोस माहिती मिळू शकली नाही.