
‘लिव्ह इन पार्टनर’वर अरबी शिकण्याची जबदस्ती करून जोडीदाराच्या धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध आणत असल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील शाहडोल जिल्ह्यातील एका 32 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. 28 वर्षांच्या महिलेने जोडीदाराविरोधात ही तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी ईर्शाद खानला अटक करण्यात आली आहे.
ही महिला 2018 मध्ये ईर्शाद खानसोबत पळून गेली होती. त्यानंतर ते दोघे एकत्र राहत होते. त्यांच्याकडे निकाह केल्याचे किंवा कोर्ट मॅरेज केल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे धनपुरी पोलिसांनी सांगितले. ती घरातून पळून गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यावेळी आपण अल्पवयीन नसून आपल्याला ईर्शादसोबत राहायचे असल्याचे तिने न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर ते काही वर्षे ते एकत्र राहत असल्याचे धनपुरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी भरत दुबे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात ती महिला आईवडिलांकडे परतली. ईर्शाद आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालत आहे. तसेच तो अरबी शिकण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही महिलेने केला. 27 नोव्हेंबर रोजी तिने पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईर्शादला अटक करण्यात आली. धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध घातल्याप्रकरणी ईर्शादवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या महिलेने धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तक्रारीत केलेला नाही. मात्र,पोलिसांकडे तिने यायाबतचा जबाब दिला आहे. तिचे आधार कार्ड सापडले असून त्यावर आधार क्रंमाक सारखे आहेत. मात्र, ईर्शादच्या धर्माशी साधर्म्य दाखवण्यासाठी तिचे नाव बदलण्यात आले आहे, असे दिसून येते. त्यानंतर ईर्शादला नोटीस पाठवून तिचे धर्मांतर करण्याबाबतची विचारणा करण्यात आली. तिचे धर्मांतर केले आहे काय, किंवा धर्मांतराबाबतची माहिती न्यायदंडाधिकाऱ्यांना दिली आहे काय,याची विचारणा करण्यात आली. याबाबतची माहिती न्यायदंडाधिऱ्यांना दिली नसल्याचे ईर्शादने स्प्ष्ट केले, असे धनपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी रत्नांबर शुक्ला यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 17 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते की, राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार आरोपींना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. तसेच या विवाहात सहभागी असलेल्या स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रद्द करणे प्रस्तावित आहे. तसेच हे विवाह रद्द ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.



























































