
सामना ऑनलाईन, मुंबई
दहा रुपयांची जुनी आणि फाटकी नोट सोमवारी एका तरुणाच्या जिवावर बेतली. भाजी घेतल्यानंतर मोहम्मद अस्लम सिद्धीकी (35) याने दहा रुपयांची नोट भाजीविक्रेत्याला दिली; पण नोट फाटकी आणि जुनी असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये तु तु मै मै झाली. त्यावेळी रागावलेल्या भाजीवाल्याने भाजी कापायच्या सुऱ्याने सिद्दीकीवर वार केले. त्यातच सिद्धीकीचा मृत्यू झाला.
साकीनाका येथे राहणारा सिद्धीकी चर्नी रोड येथे कारपेंटरचे काम करायचा. सोमवारी रात्री कामावरून घरी परतताना सिद्धीकी याने दादरला उतरून भाजी घ्यायचे ठरवले. त्यानुसार रात्री साडेदहाच्या सुमारास तो दादरला उतरला. फलाट क्रमांक एकच्या बाहेर सोनीलाल सुखदेव महंतो (25) हा भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. सिद्धीकी त्याच्याजवळ गेला आणि काही भाजी खरेदी केली. त्यानंतर त्याने दहा रुपयांची जुनी व फाटकी नोट महंतोला दिली. त्या नोटेवरून दोघांमध्ये वाद झाला. सिद्दीकी दुसरी नोट बदलून देत नसल्याने महंतोचा पारा चढला. त्याने जवळ असलेल्या सुऱ्याने थेट सिद्दीकीवर वार केले आणि महंतोने तेथून पळ काढला. शिवाजी पार्क पोलिसांनी जखमी सिद्धीकीला शीव रुग्णालयात नेले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी महंतोला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये पकडले. तो पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता; पण तो मुंबईबाहेर सटकण्याआधीच शिवाजी पार्क पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.



























































